Ad will apear here
Next
उत्सुकता ‘नाशरी टनेल’ची...
चेनानी-नाशरी टनेल, जम्मू-काश्मीर रस्ता

बस थांबली. समोर ‘वेलकम टू नाशरी टनेल’ असं लिहिलेलं. मी खूप उत्साहात होतो. कारण तीन महिन्यांपूर्वी भारतातील या सर्वांत लांब बोगद्याचं उद्घाटन झालं होतं. आणि आता त्याच टनेलमधून मी जाणार होतो.... स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या एका तरुण लेखकाच्या अमरनाथ भटकंतीच्या ‘अमरनाथ ट्रेक’ या ट्रॅव्हलॉगचा हा सातवा भाग...
.........................................
यावर्षी मे महिन्यात नरेंद्र मोदींनी काश्मीरमधील 'चेनानी नाशरी' या भारतातील सर्वात लांब बोगद्याचं उदघाटन केलं. यापूर्वी 'जवाहरलाल टनेल' हा भारतातील सगळ्यात लांब बोगदा होता, ज्याला बनिहाल बोगदा असंही म्हणतात. हा बनिहाल बोगदा मात्र खूप अरुंद आहे. पण नव्याने निर्माण झालेल्या या नऊ किलोमीटर लांब बोगद्याबद्दल फक्त न्यूज चॅनलवर झालेली चर्चा बघितली होती. तेव्हा मला कल्पना नव्हती, की तीन महिन्यांनी त्यातून मला जाता येईल, तो जवळून बघता येईल.

पटनीटॉपलंगरवर उदरभरण कर्म आटोपून आमचा ताफा घाटमाथ्यावर वरवर सरकू लागला. रस्त्यात काही वेळ थांबल्यावर व्याघ्र आणि चिता दर्शनही झाले. मी झोपलो नव्हतोच. कानात इअरफोनच्या वायरी अडकवून संगीत रसग्रहण करणं  सुरू होतं. बतोते आणि प्रसिद्ध हनिमून स्पॉट, थंड हवेचे ठिकाण आणि नैसर्गिकरित्या प्रेक्षणीय स्थळं असलेलं पटनीटॉप हे जम्मू ते श्रीनगरला या रस्त्यावर लागतात. हा रस्ता उंच सखल भागाचा आहे. श्रीनगरला जाताना संपूर्ण रस्ता हा हिमालयाच्या घाटातून उंचीवर जात असताना 'बतोते'ला जाताना मात्र काही वेळ उंचावर जाऊन पुन्हा खाली उतरावं लागतं आणि मग पुन्हा वर जावं लागतं. मी वाट पाहत होतो पटनीटॉप या प्रसिद्ध आणि सुंदर गावाची.

बस थांबली. समोर 'वेलकम टू नाशरी टनेल' लिहिलेलं, 'फोटो काढण्यास सक्त मनाई' अशा मोठ्या अक्षरात लिहिलेल्या सूचना होत्या. मी खूप उत्साहात होतो. कारण तीन महिन्यांपूर्वी भारतातील या सर्वात लांब बोगद्याचं उदघाटन झालं होतं. त्यावर मी फेसबुकवर पोस्टही लिहिली होती, जी खूप हिटही झाली होती. आणि आता त्याच टनेलमधून मी जाणार होतो.

बस बोगद्यातून जाऊ लागली. आत जागोजागी हवा येण्याची सुविधा होती लाईट्स होते. त्यामुळे प्रकाश होता, मुख्य म्हणजे या बोगद्यात पाचशे मीटरवर टेलिफोन बूथ आहेत आणि त्यासंबंधी सूचना दिल्या आहेत, की इतक्या इतक्या मीटरवर पुढील फोनबुथ शिवाय फर्स्ट एड किट आहे. सुंदर सुसज्ज आणि मुख्य म्हणजे रुंद असा बोगदा आहे. या बोगद्याच्या निर्मितीचं काम काँग्रेसच्या राजवटीत सुरू होऊन यावर्षी भाजपाच्या राजवटीत पूर्ण झाले. ही एक परिपूर्ण राष्ट्रीय वारसा- संपत्ती आहे.

नऊ किमीच्या या बोगद्यातून बाहेर आलो. अंधारातून प्रकाशाकडे आलो. छान वाटलं, कारण शेवटी नैसर्गिक सूर्यप्रकाशाची जागा कोणताही कृत्रिम प्रकाश घेऊ शकत नाही. पुढे गेल्यावर समजलं, की या बोगद्यामुळे खरं तर बतोते आणि पटनीटॉप हे गावे लागलेच नाहीत. यामुळे प्रवासातील दोन तास वाचले. फार पूर्वी जम्मूहुन श्रीनगरला जाण्यास दहा ते बारा तास लागत. जवाहरलाल बोगद्यामुळे काही तास कमी झाले आणि आता या नाशरी टनेलमुळे दोन तास आणखी कमी झाले आहेत. शिवाय प्रवासातील अपघातांचा धोकाही खूप कमी झाल्याचं निरीक्षण आहे. याशिवाय रस्त्यात जागोजागी नव्या बोगद्यांचे बांधकाम होताना दिसत होते.

दोन-एक तासांनी बस पुन्हा चहासाठी थांबली. तिथेही लंगर होता. लोक जेवायला प्रेमाने आवाहन करत होते. पण माझ्या पोटाची अवस्था बिघडलेलीच होती. दोन तासांपूर्वी पोटाला गृहीत धरून आधीच्या लंगरवर अन्नग्रहण केले होते आणि पोटाने उग्र भूमिका घेतली. काय करावं निर्णय होत नव्हता! पुढील तीन ते चार तासांचा प्रवास निर्विघ्न पार पडेल ना याबाबत साशंक होत होतो. कारण मी कितीही पोटाला, अन्नाला जिंदाबाद म्हणत होतो, तरी पोट मात्र ‘मुरडाबाद’ म्हणत होतं. मला हा मुरडा स्वस्थ प्रवासात बाद तर करणार नाही याची धास्ती होती. शेजारी खाली पसरट दरी खुणावत होती. बस रस्त्याच्या बाजूने लागलेली. यात्रेकरू खाण्यात गुंग. माझ्याकडे फार थोडा वेळ होता. पटकन निर्णय घेणे, ही पोटाची काळाची आणि  पोटातील कळेची गरज होती.

तेवढ्यात मला खाली दरीत आशेचे काही किरण दिसले. तीन चार लोक दरीतून वर येत होते. त्यांच्या हातात प्लास्टिकच्या बॉटल्स होत्या! अहाहा..! एके काळचा भारतातील जगविख्यात लोटा, शौचखूण आता काळाच्या पडद्याआड गेला त्याची जागा बाटलीने घेतली आहे. माझा निर्णय झाला पक्का, बाटलीवर मारला शिक्का! ‘स्वच्छ भारत अभियान’चा मी समर्थक असलो, तरी थोडा वेळ माझा राष्ट्रीय स्वच्छतेचा बाणा बाजूला ठेवणंच मला योग्य वाटलं, नाहीतर भारत स्वच्छता अभियान करतांना वैयक्तिकरित्या अस्वच्छ होण्याची नामुष्की माझ्यावर ओढवली असती. 

नुकतीच विकत घेतलेली, नवी-कोरी मिनरल वॉटर बॉटल मी हाती घेतली आणि दरी उतरू लागलो. पसरट असल्याने खूप तीव्र उतार सुरवातीला नव्हता. तोल सांभाळत मी खाली उतरलो. आडोसा शोधणं क्रमप्राप्त होतं. उतरताना लोकांच्या बऱ्याच ‘मुरडा बाद’च्या पाऊलखुणा दिसल्या. अनेकांनी आपले प्रातःविधी माध्यान्नाला उरकलेले दिसत होते. अस्वलाला, वाघाला दुरूनच माणसाच्या अस्तित्वाची चाहूल त्याच्या वासाने लागते म्हणतात. पण माणसाला इतर माणसाची चाहूल वेगळ्याच वासाने लागत असते. मी माझा पाय भाजू नये म्हणून माणसांच्या त्या सर्व फाउलखुणा वाचवत जात होतो. नाहीतर चुकीच्या जागी पाऊल पडलं, तर माझाच फाउल व्हायचा! 

दरीत काही ठिकाणी झरे होते. पाऊस नसल्याने घसरंड नव्हती हे फार बरं होतं. एक मोठी शिळा दिसली आणि युरेका.. युरेका.. मी मनात ओरडलो! त्या शीळेच्या आडोशाने निसर्गाच्या हाकेला निवांतपणे ओ दिला! हुश्श करत हलकेपणा अनुभवत वेगाने वर आलो! आमची बस आणि यात्रेकरू लंगरवर उदरभरण करतच होते! नशीबवान होते. मी मात्र ‘उदरभरण नोहे केलेची पाहिजे धावनकर्म’ करत होतो.
(क्रमशः) 
- अभिजित पानसे
मोबाइल : ८०८७९ २७२२१ 
ई-मेल : abhijeetpanse.1@gmail.com

(‘अमरनाथ ट्रेक’ हा ट्रॅव्हलॉग दर शनिवारी ‘बाइट्स ऑफ इंडिया’वर क्रमशः प्रसिद्ध होईल. त्यातील सर्व लेख एकत्रितरीत्या https://goo.gl/V6rLmU या लिंकवर उपलब्ध असतील.)
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/CZXMBJ
Similar Posts
एक चित्तथराक क्षण माझ्या डावीकडे एका दरीच्या तोंडावर शिळेचा एक उंचवटा होता. त्या दरीतून एक चित्ता वर आला. काही क्षण शिळेवर उभा राहिला आणि वेगाने उडी घेत आमच्या बसकडे झेपावला समोर एक सुमो होती. क्षणात त्याने तिच्या डिकीवर उडी घेतली आणि चपळाईने पलीकडील उंचवट्यावर उडी घेऊन खाली जंगलात शिरला. अप्रतिम आणि चित्तथरारक असं ते दृश्य होतं
..आणि सामान्य माणूसही होतो जिगरबाज सैनिक.. अमरनाथ यात्रा पुढे धार्मिक न राहता ती हळूहळू राष्ट्रीय यात्रा होऊ लागते आणि शेवटी ती फक्त सर्वसामान्य भारतीय माणसाची देशविघातक प्रवृत्तींविरोधी असलेली राष्ट्रीय यात्रा होते. सैनिक शस्त्रानिशी तिथे झुंजत असतातच, पण दरवर्षी आतंकवादी कारवायांना न जुमानता तिथे जाणारा सामान्य माणूसही एक जिगरबाज निःशस्त्र सैनिक होऊन जातो
..आणि माझी अवस्था विक्रमादित्यासारखी झाली मी जर इथेच पहलगामला माझी वजनदार मोठी बॅग ठेवली तर मला पुन्हा याच दूरच्या रस्त्याने परत पहलगामला यावं लागणार होतं. बॅगरूपी वेताळाला पाठीवरून वर गुफेपर्यंत घेऊन जाणं केवळ अशक्य होतं. तसा प्रयत्न जरी केला तरी मृत्यू शंभर टक्के. काय करावं..? माझी अवस्था पाठीवरील वेताळाने प्रश्न विचारल्याने संभ्रमात पडलेल्या विक्रमादित्यासारखी झाली होती
देशाला काश्मीरशी जोडणारा बनिहाल बोगदा... दुपारी दोन वाजता आमच्या बसने तो बहुचर्चित खुनी आणि शैतानी नाला पार केला. थोड्याच वेळात आम्ही प्रसिद्ध जवाहरलाल बोगद्यापाशी येऊन थांबलो. हा एकमेव बोगदा भारत आणि काश्मीर खोरे यांना जोडतो. या बोगद्यातूनच काश्मीर खोऱ्यात प्रवेश करता येतो. याच बोगद्यावर पाकिस्तानचंही लक्ष असतं.. स्वच्छंद भ्रमंती करणाऱ्या

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language